काँग्रेसकडे असे दुर्लक्ष करणे, राष्ट्रवादीला महागात जाईल

0
274

चिंचवड, दि.९ (पीसीबी) – नाना काटे हे चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पूर्ण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत सक्रिय झाल्याशिवाय ही निवडणूक जिंकणे दुरापास्तच नाही तर अशक्य आहे. आता शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली, तर महाविकास आघाडीतील शिवसेना हा घटक सरळसरळ दोन हिश्श्यात वाटला जाईल. त्यामुळे आघाडीतील दुसरा महत्त्वाचा भाग राष्ट्रीय काँग्रेस या निवडणुकीत व्यवस्थित कामाला लावणे, राष्ट्रवादीसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला गृहीत धरून अनुल्लेखाने मारण्याचा जाहीर कार्यक्रम केला असला तरी आता काँग्रेसकडे असे दुर्लक्ष करणे, राष्ट्रवादीला महागात जाईल एव्हढी ताकद आजमितीस काँग्रेसकडे नक्कीच आहे. गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसने ज्या पद्धतीने उभारी घेऊन शहरात जनाधार मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, ते स्पृहणीय आणि अभिनंदनियच आहे.

गेल्या सव्वा वर्षात म्हणजेच डॉ. कौलास कदम यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी इथल्या स्थानिक आणि राहदार यांच्यात ताळमेळ साधून काँगेसला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. वस्तुतः या शहरात काँग्रेसचा पारंपरिक मतदार फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर योग्य निर्णयक्षम नेता अगर कार्यकर्त्यांची फळी नसल्याने हा मतदार काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे, तर काही प्रमाणात शिवसेनेकडे सरकला होता. मधल्या काही काळात हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे परत येण्याची शक्यता कमी झाली होती. मात्र, गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसने कात टाकली असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थात यासाठी डॉ. कैलास कदम यांनी शहराध्यक्ष म्हणून घेतलेली मेहनत कारणीभूत आहे.