औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) – आदित्य ठाकरे हे सध्या त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दौऱ्यावर असून ते औरंगाबादमध्ये आहेत. इथल्या महालगावात त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभा संपवून आदित्य ठाकरेंच्या वाहनांचा ताफा निघाला असता काही तरुणांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलीस आणि संतप्त तरुण यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे या ठिकाणी चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. यावेळी दगडफेक सुद्धा करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदित्य ठाकरे यांची सभा सुरू असताना त्या परिसरातून रमाईंची मिरवणूक सुद्धा निघाली होती. सभेच्या स्टेजच्या पाठीमागून ही मिरवणूक जात होती. या मिरवणूकीत डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात येत होता. यावेळी पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली.
यावेळी स्टेजवर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरेंचं भाषण सुरु असताना स्टेजवर कुणीतरी दगड भिरकवल्याची घटना घडली. मात्र, खैरे यांनी आपले भाषण चालूच ठेवेले. अखेर हा वाद टाळण्यासाठी आदित्य ठाकरे स्वतः स्टेजवरून खाली आले आणि त्यांचं भाषण केलं. डीजे वाजवा मात्र वाद नको असं मिरवणुकीतल्या तरुणांना आदित्य ठाकरेंनी सांगितलं. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र असल्याची आठवणही आदित्य ठाकरेंनी यावेळी करुन दिली.
मेळावा संपल्यानंतर जयंती साजरी करत असलेल्या लोकांनी आदित्य ठाकरे आणि दानवे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आदित्य ठाकरे यांची गाडी सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित बाहेर काढली. आदित्य ठाकरे त्यांची सभा संपवून निघत असताना पुन्हा एकदा त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेनंतर राजकारण सुरू झाले असून, संजय राऊत व अंबादास दानवे यांनी हल्ल्याचे खापर शिंदे गटावर फोडले आहे. आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनीच केला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे एकत्र आल्यामुळे काही लोकांनी हे जाणीवपूर्वक कट कारस्थान केलंय, असं देखील दानवे म्हणाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी होत आहे.












































