नागपूरची गुलामी…, ठाण्याची गद्दारी…, एकदम ओक्के… राहुल कलाटे विरोधात बॅनरबजी

0
528

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, बंडखोरी करत शिवसेनेचे नेते असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला; परंतु त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने चिंचवड पोटनिवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे. आता एका शिवसैनिकाने राहुल कलाटे यांच्या विरोधात चिंचवड येथील चाफेकर चौकात बॅनर लावले आहे.

दरम्यान, या बॅनरबाजीमागे खरोखर शिवसैनिक आहे की उमेदवार नाना काटे यांच्याकडील राष्ट्रवादीचाच कोणी कार्यकर्ता आहे याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. राहुल कलाटे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा यासाठी मविआच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणीही सुरू होती; परंतु त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता मविआला फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच राहुल कलाटे यांच्याविरोधात अज्ञात व्यक्तीने चिंचवडमध्ये बॅनर लावले असून, नाव न घेता राहुल कलाटे यांच्यावर त्याने जोरदार निशाणा साधला आहे. खरा शिवसैनिक नावाने हे बॅनर त्याने लावलेले आहे.

या बॅनरवर म्हटले आहे की, एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक या आशयाचा मजकूर लिहून. राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. या बॅनरची सद्या चर्चा सुरू झाली आहे.

कलाटे यांचीच मोठ्या प्रमाणावर चर्चा –

पोटनिवडणुकित भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळेल असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात सहानुभूतीचा कुठेही लवलेश दिसत नसल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, असा अंदाज भाजपला आला. त्यानंतर कलाटे यांच्या उमेदवारीवरच माध्यमांची चर्चा केंद्रीत झाली. कारण यापूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात २०१४ मध्ये स्वतंत्रपणे लढून शिवसेना उमेदवार म्हणून तब्बल ६७ हजार मते घेतली. नंतर २०१९ मध्ये सर्व विरोधकांचा अपक्ष उमेदवार म्हणून १ लाख १२ हजार मते कलाटे यांनी जगताप यांच्या विरोधात घेतली होती. आता तिसऱ्यांदा निवडणूक लढविताना आमदार जगताप समोर नाहीत म्हणून कलाटे यांचा आत्मविश्वास दुनावला आहे. त्यातच आता जगताप विरोधातील नाना काटे यांना मिळणारी मते कलाटे यांच्यामुळे विभागली जाणार असल्याने भाजपला सोयिचे आहे, असा भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांचा अंदाज आहे. त्या अर्थाने कलाटे यांची उमेदवारी कायम राहावी यासाठी अजित पवार, उध्दव ठाकरे, संजय राऊत, सचिन आहिर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र कलाटे यांनी माघार घेतली नसल्याने ही आता देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी असल्याची चर्चा सुरु आहे.