‘मविआ’कडून कसबा, चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही – नीलम गोऱ्हे

0
256

चिंचवड, दि.३ (पीसीबी) – कसबा पेठ, चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे. ‘मविआ’कडून लढताना या दोनही जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. पण, पक्षश्रेष्टी, मविआकडून जो निर्णय घेतला जाईल. त्याचे तंतोत पालन केले जाईल, असे शिवसेनेच्या उपनेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सांगितले.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आग्रही आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांची आज (शुक्रवारी) वाकडमध्ये बैठक झाली. शिवसेना संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, माजी मंत्री, उपनेते शशिकांत सुतार, उपनेत्या सुषमा अंधारे, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, मावळचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी नगरसेवक अमित गावडे यांच्यासह पुण्यातील पदाधिकारीही उपस्थित होते.

डॉ. गो-हे म्हणाल्या, ”कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या दोनही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत. शिवसैनिकांचे मनोबल चांगले आहे. दोनही ठिकाणी लढण्याची शिवसेनेची मानसिकता. दोनही जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ‘मविआ’ एकत्रित लढणार आहे. जागांची ओढाताण, रस्सीखेच कुठेही नाही. पक्षश्रेष्टी, मविआ जो निर्णय घेईल. त्यांचे तंतोत पालन केले जाईल. एकदा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्वांनी एकदिलाने काम करावे. कोणतेही समझोते होता कामा नयेत”, असेही त्या म्हणाल्या.

”महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल पडतोय हे कालच्या विधानपरिषदेच्या निवडणूक निकालावरुन स्पष्ट झाले आहे. भाजपकडे परंपरागत असलेल्या जागा ‘मविआ’ने आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. नागपूरची जागा देखील ‘मविआ’ने आपल्याकडे घेतली आहे. ‘मविआ’ची वाटचाल चांगली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकदिलाने लढले तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकते. आगामी महापालिका, लोकसभा निवडणुकांमध्ये समतोल चांगला रहावा. जागा कोणत्या पक्षाला दिली. यापेक्षा निवडून येण्याची क्षमता याचा विचार व्हावा. यादृष्टीने जागांची वाटणी व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शिवसेनेला कोणी ग्रहित धरु नये”, असेही डॉ. गो-हे म्हणाल्या.

दरम्यान, पोटनिवडणुकीबाबत शिवसैनिकांचे मत जाणून घेतले. संघटनेचा आढावा घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला असून जनतेमध्ये चीड आहे. त्यामुळे शिवसेनेने पोटनिवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली. याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्टींना सादर केला जाणार आहे.