पुणे, दि. ३ (पीसीबी) : गेल्यावर्षी शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एक दोन नव्हे तर 40 आमदारांनी आणि इतर दहा समर्थ आमदार अशा 50 आमदारांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झिडकारून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाने नंतर राज्यात सत्ताही स्थापन केली. शिवसेनेच्या या बंडावर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. तसेच गफलत कुठे झाली याची माहितीही दिली आहे.
पुण्यात एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार का फुटले? याची माहिती दिली. आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली, असं अजित पवार म्हणाले.
या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या… आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं… तिकडे हे व्हायला नको होतं… मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं. पण ते बोलले की मी बोलन एकनाथ शिंदेंशी. तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे असं उत्तर त्यांनी दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
लोकशाहीत तोडाफोडीचं राजकारण फार काळ चालत नाही. लोक नक्कीच धडा शिकवतील. तिकडे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगही नुसत्याच तारखावर तारखा देतंय. खरंतर तिकडून न्याय मिळाला पाहिजे, असंही ते म्हणाले.
विधान परिषदेच्या निकालाने सत्ताधाऱ्यांना जबरदस्त धक्का दिलाय. हा निकाल म्हणजे सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा म्हणता येईल. दुसरीकडे सत्यजीतला काँग्रेसने उमेदवारी दिली असती तर हे घडलं नसतं. विशेष म्हणजे शिक्षक वर्गाने हा निकाल दिलाय.