महिलेची फसवणूक करत लैंगिक अत्याचार

0
304

रावेेत, दि. ४ (पीसीबी) – एका दाम्पत्याने महिलेकडून ४८ लाख ४० हजार ६५९ रुपये घेतले. पैसे ठरलेल्या अटीवर परत न करता महिलेची फसवणूक केली. त्यानंतर आरोपी व्यक्तीने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार रावेत, चिंचवड परिसरात घडला. याबाबत पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यावर चौकशी करून दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित अरुण ताजणे (वय ३८), त्याची पत्नी (वय ३७, दोघे रा. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

रावेत येथे ऑक्टोबर २०२० मध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु झाले. त्यामध्ये मेडिकल सुरु करण्यासाठी डिपॉझिट म्हणून आरोपींनी फिर्यादीकडून २० लाख रुपये घेतले. त्यानंतर हॉस्पिटलसाठी उसने म्हणून २८ लाख ४० हजार ६५९ रुपये घेतले. डिपॉझिटचे पैसे हॉस्पिटल सोडताना दिले जातील. तर हातउसने घेतलेले पैसे वर्षभरात दिले जातील, असे ठरले होते. पुढे काही दिवसांनी फिर्यादी यांनी मेडिकल सोडले असल्याने त्यांनी डिपॉझिट म्हणून दिलेल्या २० लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे देण्यासाठी आरोपींनी टाळाटाळ केली.

मे २०२२ मध्ये आरोपीने फिर्यादींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून त्यांना त्रास दिला. आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे न वागल्यास फिर्यादीचे अश्लील फोटो नातेवाईकांना दाखवून त्यांची बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली. याबाबत फिर्यादींनी पोलिसात तक्रार केली आहे.