विधवा महिलांसाठी संक्रातीचे हळदीकुंकू, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांचा क्रांतिकारी उपक्रम

0
339

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – हिंदू धर्मात पूर्वी सती प्रथा होती, पण राजाराम मोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ती बंद केली. महिलांच्या शिक्षणाला धर्माचार्यांचा विरोध असे, पण सावित्रीबाईंनी क्रांति केली म्हणून स्त्री शिक्षणाची कवाडे खुली झाली. तोच आदर्श समोर ठेवून आता संक्रांत सणाच्या हळदी कुंकवाला सौभाग्यवतींच्या बरोबर आता विधवा महिला भगिनींना सन्माण दिला पाहिजे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सिमाताई सावळे यांनी व्यक्त केले.

विधवा महिलांसाठी हळदीकुंकु या कार्यक्रमासाठी जयगणेश साम्राज्य आणि जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिमाताई सावळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या वर्षीपासून आपल्या प्रभागातील हळदी कुंकू समारंभात सध्वा महिलांच्या बरोबरीने विधवा भगिनींनासुध्दा सन्माण देण्याचा उपक्रम सिमाताई सावळे यांनी सुरु केला. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. परिसरातील महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

महिलांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सिमाताई म्हणाल्या, आजचे जग खूप बदलते आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे देशात मोठी क्रांति झाल्याने समाजसुध्दा कालबाह्य प्रथा परंपरा सोडून देतो आहे. बदल हा तसा सृष्टीचा नियम आहे आणि जो काळानुरुप आपले आचार विचार बदलतो तोच प्रवाहात, स्पर्धेत टिकतो. सुदैवाने आपला धर्मसुध्दा आता आधुनिक विचारांनुसार परिवर्तनशील झाला आहे. त्यासाठीच संक्रातीचे हळदी कुंकूवाला सौभाग्यवती महिलांच्या बरोबरीने विधवा महिलांना सन्माण देण्याला आम्ही सुरवात केली आहे.

सोहळ्यात सहभागी झालेल्या महिलांना सिमाताईंच्या या क्रांतिकारी विचारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. विजया चौगुले यांनी खूप मौलिक विचार यावेळी मांडले. मिनक्षी हांडे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. ज्योती सोनवले, स्वाती पांचाळ, निलम सोलापुरकर, योगिता विभुते, विशाखा बनसोडे, मनिषा गारुडे, रंजना शेंडे तसेच २० ते २५ विधवा महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी निवृत्ती अमुप, संतोष धायवार व गाढवे साहेब यांनी सहकार्य केले.