मद्यपी तरुणांचे पोलिसांशी उद्धट वर्तन

0
359

रावेत, दि. १५ (पीसीबी) – दोघा मद्यपींनी हॉटेल मधील वेटरला सिगारेट घेण्याच्या कारणावरून मारहाण केली आणि दुचाकीवरून भरधाव वेगात पळ काढला. मात्र मद्यपी चालकाचे नियंत्रण सुटून दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतरही पळून जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र दोघांनी पोलिसांशी देखील उद्धट वर्तन करत आरडाओरडा केला. हा प्रकार मंगळवारी (दि. १४) मध्यरात्री तीन वाजता वाल्हेकरवाडी रोड, रावेत येथे घडला.

आकाश करम गंगावणे (वय २८), भूषण राजेंद्र राक्षे (वय २६, दोघे रा. रुपीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई तानाजी कचरे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि भूषण या दोघांनी मंगळवारी मध्यरात्री मद्यप्राशन केले. त्यांनतर रावेत येथील एका हॉटेलमध्ये जाऊन वेटरसोबत सिगारेट घेण्यावरून वाद घातला. वेटरला मारहाण करून दोघेही दुचाकीवरून भरधाव वेगात पळून गेले. पळून जात असताना भूषण याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर पडले.

त्यानंतर देखील दोघे उठून पळून जाऊ लागले. त्यावेळी तिथे असलेले पोलीस शिपाई तानाजी कचरे यांनी आकाश व भूषण यांना थांबवले. दोघांनी पोलिसांसोबत उद्धट वर्तन करून मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.