रिपाई गवई गटाचा नाना काटे यांना पाठिंबा

0
370

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत, खरात गट तसेच इतर समविचारी घटक पक्ष हे एकजुटीने भाजपला पराभूत करण्यासाठी सक्रिय झालेले असताना आता या आघाडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची देखील भर पडली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांचे जनरल सेक्रेटरी सौ. लताताई ओव्हाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समर्थन देत असल्याचे स्पष्ट केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

चिंचवड मतदारसंघात गवई गटाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे नाना काटे यांच्या पारड्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झुकणार आहे. यामुळे नाना काटे यांनी मोठी आघाडी या निवडणूक प्रचारात घेतली असल्याचे दिसून येत आहे. स्वतः अजित पवार यांनी ही निवडणूक हातात घेतल्याने राष्ट्रवादी भक्कम परिस्थितीत दिसत आहे.
येत्या काळात निवडणूक प्रचारात देखील गवई गटाचे कार्यकर्ते सक्रिय होणार असल्याने त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे.