RFD विरोधात लढा तेज – पिंपरी-चिंचवडमध्ये ‘नदी बचाव वॉर रूम’ कार्यरत

0
5

पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या नद्यांचे नैसर्गिक प्रवाह, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आला असतानाही, स्थानिक प्रशासनाकडून ‘River Front Development’ (RFD) प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांत सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची कोणतीही ठोस योजना नाही. याउलट, नदीकाठावरील देवराई आणि वनराईतील झाडांची कत्तल, पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे, व नदीपात्रात भराव टाकून काँक्रीटच्या भिंती बांधणे – हे नद्यांच्या मूळ अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहे.

या पार्श्वभूमीवर, RFD प्रकल्प रद्द करण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे. पर्यावरण प्रेमी, स्थानिक रहिवासी, सामाजिक संस्था आणि विविध पर्यावरण संघटना यांच्यातून एकत्र येत, ‘Pune PCMC River Revival’ या नागरिक पुढाकारातून ‘नदी बचाव वॉर रूम’ ची पिंपरी मध्ये पालिका भवनाच्या समोर मध्यवर्ती भागात स्थापना करण्यात आली आहे.

आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या वॉर रूमचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या केंद्रातून पुढील काळात नागरिकांच्या पुढाकारांचे समन्वय, RFD विरोधातील लढ्याचे नियोजन, माहितीचे सुसूत्रीकरण आणि जनजागृतीसाठी रणनीती तयार केली जाणार आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांनी नदी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि पिंपरी-चिंचवडमधील नद्यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. हा पुढाकार केवळ नदी बचावासाठीच नव्हे, तर शहराच्या पर्यावरण-संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.