पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे निधन, मोहालीच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

0
324

पंजाब, दि. २६ एप्रिल (पीसीबी)- पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे सरदार प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी (२५ एप्रिल) मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात निधन झाले. त्यांचा मुलगा आणि पक्षाध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या पीएने याला दुजोरा दिला. प्रकाश सिंग बादल यांना बराच काळ मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर, आठवडाभरापूर्वी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

९५ वर्षीय प्रकाश सिंग बादल यांच्या प्रकृतीत सोमवारी (२४ एप्रिल) थोडीशी सुधारणा झाली. मात्र मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या बादल यांना गेल्या वर्षी जूनमध्ये गॅस्ट्र्रिटिस आणि श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि ट्विट केले की, “प्रकाश सिंह बादल जी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे.

ते भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि एक उल्लेखनीय राजकारणी होते ज्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि महत्त्वाच्या काळात राज्याला साथ दिली.”