बिग बॉस’चा विजेता होताच पुण्याच्या एमसी स्टॅनच नशीब उजळल! ट्रॉफीसह मिळाली ‘इतकी’ रक्कम वाचून तुम्हीही थक्क

0
415

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रविवारी (१२ फेब्रुवारी) पार पडला. रविवारी रात्री उशिरा बिग बॉस हिंदीच्या विजेत्याची घोषणा झाली. पुण्याचा रॅपर अशी ओळख असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला. तर मराठमोळा शिव ठाकरेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. एमसी स्टॅनवर यावेळी बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

यंदा ‘बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले. या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यावेळी सर्वप्रथम एका टास्कदरम्यान शालीन भानोत हा घराबाहेर पडला. यानंतर अर्चना गौतम हिचा बिग बॉसचा प्रवास संपला. यामुळे शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी हे तीन जण बिग बॉसचे टॉप ३ स्पर्धक ठरले.

यानंतर अनेकांनी शिव ठाकरे आणि प्रियांका चौधरी हे टॉप २ चे सदस्य असतील, अशी शक्यता वर्तवली होती. पण हा अंदाज चुकीचा ठरवत प्रियांका चौधरी ही टॉप ३ मधून बाहेर पडली. त्यामुळे शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण टॉप २ सदस्य ठरले. यानंतर सलमान खानने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला मंचावर येण्यास सांगितले.

यानंतर सलमानने बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेत्याची घोषणा केली. त्याने शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांपैकी पुण्याचा रॅपर असलेल्या एमसी स्टॅनचा हात उंचावत तो विजेता असल्याचे जाहीर केले. यावेळी एमसी स्टॅनला आश्चर्याचा धक्का बसला. तर शिव ठाकरेला दुसऱ्या क्रमांकावर स्थान मानावे लागले.

एमसी स्टॅन हा बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याबरोबरच त्याच्यावर इतर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार ही रक्कम देण्यात आली. त्याबरोबरच त्याला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली. सध्या त्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अनेकजण त्याला शुभेच्छाही देताना दिसत आहे.