माजी मंत्री राजेश टोपे यांचीही उपस्थिती; भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचे होणार राष्ट्रवादीत प्रवेश
चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज पिंपळे निलख येथे जाहीर सभा होणार असून या सभेमध्ये भाजपला खिंडार पडणार हे आजच स्पष्ट झाले आहे. या सभेत भाजपचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने भाजपचा पराभव निश्चित मानला जात आहे.
चिंचवड विधानसभेची सध्या पोटनिवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले असून पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपला पळता भुई थोडी केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा विजय अधिक दमदार करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला खिंडार पाडण्याची योजना आखली आहे. त्याचाच प्रत्यय उद्याच्या अजितदादा पवार यांच्या सभेत येणार आहे. पिंपळे निलख येथे शनिवारी (दि. १८) सायंकाळी ही सभा होणार असून या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.