चिखली, दि. १५ (पीसीबी) – स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा चिखली पोलिसांनी पर्दाफाश केला. स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करत त्याच्यासह स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १३) सायंकाळी बीपीएस स्पा सेंटर चिखली येथे करण्यात आली.
स्पा सेंटर मॅनेजर भूषण दत्तात्रय माळी (वय २४, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह स्पा सेंटर मालक शैलेश वाल्हे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली मुंडकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपींनी आपली उपजीविका भागवली. स्पा सेंटरच्या बाजूला दवाखाना आणि इतर कार्यालये असताना देखील आरोपींनी स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरु केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.











































