महापालिकेतर्फे शिवजयंतीला प्रबोधन पर्व

0
468

पिंपरी, १४ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो. यासाठी महानगरपालिका विविध प्रबोधन पर्वाचे आयोजन करीत असते. या महिन्यात शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्वाचे आयोजन केले असून या प्रबोधन पर्वास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. प्रबोधन पर्वाचे भक्ती-शक्ती चौक निगडी, संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेजवळ चिंचवड, डांगे चौक थेरगांव तसेच एच.ए. कॉलनी पिंपरी या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

भक्ती-शक्ती उद्यान निगडी येथे बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता देवानंद माळी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत पोवाड्यांचा कार्यक्रम तर रात्री ८ वाजता डॉ. शिवरत्न शेट्ये यांचे “असे होते छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शाहीर सम्राट अवधूत विभूते यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत पोवाड्यांचा कार्यक्रम व रात्री ८ वाजता व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे “व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांचे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १७ ते १९ फेब्रुवारी सलग ३ दिवस सायंकाळी ७ वाजता मित्राय प्रोडक्शन,कोल्हापूर यांचे मा. राष्ट्रपती महोदय यांच्या समोर दिल्ली येथे सादर झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित २५० कलाकार, हत्ती, घोडे, उंट यांचा समावेश असलेले ५ मजली सेटवरील “शिवगर्जना” हे भव्य महानाट्य सादर होणार आहे.


संभाजीनगर, कमलनयन बजाज शाळेशेजारी, चिंचवड येथे गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्यात्या तृप्ती धनवटे-रामाने यांचे “छत्रपती शिवाजी महाराज व आजची पिढी” या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहे तर शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते रविंद्र खरे यांचे “छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन” विषयावरील व्याख्यान आणि शनिवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते गणेश शिंदे यांचे “जीवन जगण्याचा मंत्र सुंदर” या विषयावरील व्याख्यान होणार आहे. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते बाजीराव महाराज बांगर यांचे “छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती संभाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.


डांगे चौक, थेरगांव येथे शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा शाहिरीचा कार्यक्रम तर शनिवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सुधाकर वारभुवन यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण आणि रविवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्याते तात्यासाहेब मोरे यांचे “आदर्शराजे छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरील व्याख्यान होणार आहे.

एच. ए कॉलनी,पिंपरी या ठिकाणी रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता व्याख्याते डॉ. प्रमोद बो-हाडे यांचे “छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता ” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. त्यानंतर दस्तगीर अजीज काझी यांचे “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची जीवन मुल्ये” या विषयावर व्याख्यान होणार आहे.