दि.२९(पीसीबी)-पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPML पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा राजीनामा टपालाद्वारे सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
योगेश होळे हे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय माजी अध्यक्षांच्या कार्यकाळात झालेल्या ठरावाद्वारे घेण्यात आला होता. मात्र, त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यात पदोन्नती प्रक्रिया, बस भाडेपट्टी करार, तसेच मध्यस्थीशी संबंधित बाबींचा समावेश आहे.
याशिवाय, काही ऑडिओ क्लिप्सशी त्यांचा संबंध असल्याचेही आरोप समोर आले असून त्यामुळे हा वाद अधिकच गडद झाला आहे.दरम्यान, “आपले पुणे आपला परिसर” या नागरिक संघटनेने या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. या संघटनेचे प्रतिनिधी उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी स्पष्ट केले आहे की, राजीनामा हा चौकशीचा शेवट ठरू नये.
जर गैरव्यवहार सिद्ध झाले, तर संबंधित अधिकाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि पेन्शन यांसारखे लाभ रोखण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, कामगारांशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर आरोप करण्यात आले असून, अशा व्यवहारातून गेलेली रक्कम परत वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत, तर लोकायुक्त किंवा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.या प्रकरणात पुढे काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








































