PMPML च्या तिकीट दरवाढीवर प्रवाशांची तीव्र नाराजी

0
5

दि . ७ ( पीसीबी ) – पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) बसने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अलीकडील दरवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १ जूनपासून अचानक मोठ्या प्रमाणात बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली असून, ही सेवा वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा आर्थिक बोजा पडत आहे.

ही बस सेवा शाळा, कॉलेज, कार्यालये आणि विविध ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रवाशांसाठी अत्यावश्यक आहे. प्रवाशांपैकी सुमारे ५० ते ६० टक्के प्रवासी महिलांचा समावेश आहे. अशा वाढीव दरांमुळे त्यांचे रोजचे बजेट कोलमडले आहे.

“सार्वजनिक वाहतूक ही सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी असते. PMPML ही परवडणारी सेवा होती, मात्र तिकीट दरात अचानक वाढ करून ती सामान्यांपासून दूर केली जात आहे,” असा आरोप प्रवाशांनी केला.

प्रवाशांचे म्हणणे आहे की, एवढे पैसे भरूनही बस वेळेवर येत नाही, तसेच बसमध्ये बसण्यास जागा मिळत नाही. परिणामी, अनेक नागरिक पर्यायी व्यवस्था शोधू लागले आहेत. गेली अनेक वर्षे फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून केवळ दरवाढ केली जात आहे, याचे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

प्रवाशांनी PMPML प्रशासनाकडे विनंती केली आहे की, “तिकीट दरामध्ये तातडीने फेरविचार करावा, तसेच बसच्या फेऱ्या व सुविधा वाढवाव्यात,” जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना योग्य दरात वेळेवर आणि सुरक्षित प्रवास करता येईल.