एक अल्पवयीन मुलगा ताब्यात
दि. 1 (पीसीबी) – संत तुकाराम नगर येथे २५ फेब्रुवारी रोजी रात्री एका टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. दोन तरुण मोबाईल मध्ये रिल्स पाहत असताना हसल्याने हा वाद झाला होता. या प्रकरणात संत तुकाराम नगर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अमन अजीम शेख आणि सिद्धार्थ राजू वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या मारामारीचे सीसी फुटेज पीसीबी टुडे च्या इंस्टाग्राम पेजवर 42 लाख लोकांनी पाहिले होते. व्हायरल क्लिप ची पोलिसांनी दाखल घेतली आणि कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी सांगितले, २५ फेब्रुवारी रोजी सिद्धेश बजरंग सालवी आणि त्याचा मित्र संत तुकाराम नगर मधील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल जवळ एका गल्लीत मोबाईल मध्ये रिल्स पाहत बसले होते. आरोपी देखील त्यांच्यापासून काही अंतरावर थांबले होते. दरम्यान रिल्स पाहताना सिद्धेश आणि त्याचा मित्र हसले. या कारणावरून आरोपींनी अचानक दोघांना मारण्यास सुरुवात केली. सुमारे आठ ते दहा जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
आतापर्यंत या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले आहे. दोन आरोपींना ३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलावर देखील यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. इतर तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही कुंभार म्हणाले.