मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेबद्दल भाष्य करताना मोठ विधान केल आहे. समाज विभागला गेल्याचा फायदा दुसऱ्यांनी घेतला आणि त्यामुळेच भारतावर आक्रमण झाली. देशातील हिंदू नष्ट होण्याची भीती दिसतेय का ? हे तुम्हाला कोणता ब्राह्मण सांगणार नाही, ते तुम्हाला स्वतःलाच समजून घ्यावं लागेल, असं म्हणत भागवत यांनी जातीव्यवस्थेसाठी पंडितांना जबाबदार धरलं आहे.
संत रोहिदास जयंतीनिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आरआरएस सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात भागवत यांनी हे विधान केलं आहे.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, ईश्वराने नेहमीच म्हटलंय की, सर्वजण माझ्यासाठी समान आहेत. त्यात कोणताही वर्ण किंवा जाती नाही. पण, पंडितांनी ही जातीव्यवस्था बनवली. हे चुकीचं होतं. शास्त्रांच्या आधारे पंडित जे सांगतात, ते चुकीचं आहे. देशात सर्वजण एक आहेत. त्यात कसलंही अंतर नाही. फक्त मतं वेगवेगळी आहेत. धर्माला बदलण्याचे प्रयत्न आपण केले नाही. धर्म बदलला असता, तर सोडला असता असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, असंही भागवत म्हणाले.
संत रोहिदास तुलसीदास, कबीर, सूरदास यांच्यापेक्षा मोठे होते. त्यामुळेच ते संतशिरोमणी होते. संत रोहिदास शास्त्रात ब्राह्मणांसोबत जिंकू शकले नाही, पण त्यांनी लोकांची मनं जिंकली आणि ईश्वर आहे, याबद्दल विश्वास निर्माण केला, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.
संत रोहिदासांनी समाजाला सांगितलं की, ‘धर्मानुसार कर्म करा. पूर्ण समाजाला जोडा. समाजाच्या उन्नतीसाठी काम करा, तोच धर्म आहे.’ त्यांनी सांगितलं की, ‘फक्त स्वतःचा विचार करणं आणि पोट भरणं धर्म नाही”, असं भागवत यांनी मत मांडले.
भागवत म्हणाले की, काशीतील मंदिर तोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की, ‘हिंदू असो वा मुस्लिम, आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत. जर तुम्हाला हे अमान्य असेल, तर उत्तरेकडे तुमच्याशी युद्ध करायला यावं लागेल.’ समाज आणि धर्माकडे द्वेषाच्या नजरेतून बघू नका. गुणी व्हा. धर्माचं पालन करा. समाजात बेरोजगारी वाढत असून, त्यात कामाकडे छोटं-मोठं म्हणून बघणंही मोठं कारणं आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
पुढे मोहन भागवत असंही म्हणाले की, जगात प्रतिष्ठा, शक्ती, भविष्यातील संधी या सगळ्यांमध्ये आपला देश प्रगती करत आहे. पण, हे शक्य होण्यासाठी हल्ली रोडमॅप शब्द वापरला जातो. तो रोडमॅप सर्वांगिण विचाराने कुणी मांडला असेल, तर तो संत रोहिदास महाराजांनी मांडला, असंही भागवत यावेळी म्हणाले.