OnePlus स्मार्टफोनच्या भयानक स्फोटामुळे 8 वर्षांचा मुलगा संकटात…

0
936

नवी दिल्ली,दि.३०(पीसीबी) – OnePlus ने अलीकडेच आपल्या Nord सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. परंतु आता OnePlus Nord 3 स्मार्ट फोन मध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वापरकर्त्याने Twitter वर OnePlus Nord 3 च्या स्फोटाची माहिती दिली. हा OnePlus स्मार्टफोन 18 जुलै 2023 रोजी Amazon India वरून खरेदी करण्यात आला होता.

रितेश कुमार मीणा असं त्या वापरकर्त्याचं नाव असून त्याच्या मते , त्याने १८ जुलै 2023 रोजी Amazon India वरून OnePlus Nord 3 स्मार्टफोन घेतला होता आणि त्याच मध्यरात्री या फोनचा स्फोट झाला. रितेश सांगतो की, त्याचा 8 वर्षांचा मुलगा या अपघातातून कसातरी बचावला. परंतु त्याची ऐकण्याची क्षमता कमी झाली असून त्याला इतर अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहेत. सध्या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या रितेशच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अपघातात देवाच्या कृपेने त्याचे आणि संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचल्याचे रितेश सांगतो. मात्र त्यांचे संपूर्ण कुटुंब शॉकमध्ये आहे.

राजधानी दिल्लीत राहणाऱ्या रितेशने वनप्लस इंडिया, अॅमेझॉन, ओप्पो इंडिया आणि दर्शिता इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रितेश सांगतात की, त्याने वनप्लस आणि अॅमेझॉनच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक तक्रारी नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे ट्विटर अकाउंट कंपन्यांनी ब्लॉक केले.

रितेशने सोशल मीडियावर सांगितले की, वनप्लस कंपनीची टीम त्याच्या घरी आली आणि ब्लास्ट झालेला फोन त्याच्याकडे देण्यास सांगितले. परंतु कंपनीने पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी 2022 मध्ये देखील OnePlus Nord 2 स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोशल मीडिया अकाउंटवर अनेक युजर्सनी तक्रारी केल्या होत्या. सध्या, कंपनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर, अनेक वापरकर्त्यांनी फोनमध्ये ग्रीन लाइनच्या समस्येबद्दल माहिती दिली आहे.