NEET ची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या

0
254

राजस्थान,दि.०२(पीसीबी) – राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही सुरूच आहे. आता नीटची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. निशा यादव (वय 21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील रहिवासी होती.

मृत निशा ही महावीरनगर 1 परिसरातील वसतिगृहात राहत होती. निशाने बुधवारी रात्री तिच्या खोलीत गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवला आहे. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. वडिलांनी वसतिगृहात सोडल्यानंतर ते गावी परतताच निशाने आत्महत्या केली. पूर्वी ती इंद्रविहार परिसरात राहत होती. 18 नोव्हेंबरलाच निशा तिचे वसतिगृह बदलून महावीरनगर 1 परिसरात राहायला आली. यावेळी तिचे वडीलही तिच्यासोबत होते. कोटामध्ये 6 दिवस राहून निशाचे वडील 23 नोव्हेंबरला परतले. रात्री उशिराही निशा वडिलांशी फोनवर बोलली होती. त्यानंतर खोलीत गळफास घेतला. वडिलांनी पुन्हा फोन केला असता निशाने फोन उचलला नाही.

दरम्यान, वडिलांना संशय आल्याने त्यांनी रात्री 1 वाजता वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना बोलावून निशाशी बोलण्यास सांगितले. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी गेट वाजवले असता निशाने दरवाजा उघडला नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी वसतिगृह चालकाला माहिती दिली. त्यानंतर दार तोडले असता निशाने गळफास घेतल्याचे दिसून आले.