भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या रविवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर!

0
303

पिंपरी दि. १७ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे सर्वात कमी वयाचे आणि व्हीजनरी तसेच उच्चशिक्षित खासदार म्हणून ओळख असलेले तेजस्वी सूर्या हे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा करणार आहेत. रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शहरात येणार आहेत, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्‍यक्ष महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘युथ डॉयलॉग वुईथ तेजस्वी सूर्या’’ या कायक्रमाचे आयोजन केले आहे. शहरातील उच्चशिक्षित नागरिक, तसेच आयटीयन्स यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया व्हीजन’बाबत जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते. भारताची जागतिक पातळीवर ‘महासत्ता’ अशी ओळख निर्माण होत आहे. त्यामागे ‘न्यू इंडिया व्हीजन’ चे योगदान काय आहे? याबाबत पिंपरी-चिंचवडकरांना माहिती मिळावी. या करिता हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

पिंपळे सौदागर येथील कापसे लॉन्स येथे दि. १९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चा, भाजपा आयटी टीम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आयटी मिलन विभाग, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील आयटीयन्स, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, डॉक्टर्स, वकील, सीए अशा उच्चशिक्षित रहिवाशांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘न्यू इंडिया व्हीजन’ विस्तृतपणे सांगण्यात येणार आहे. त्याद्वारे जगाच्या नकाशावर देशाची ओळख ‘बलशाली भारत’ अशी होत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडकर कसे योगदान देवू शकतात? याबाबत तेजस्वी सूर्या मार्गदर्शन करणार आहेत.

‘‘लोकल टू ग्लोबल कनेक्ट वुईथ तेजस्वी सूर्या’’…

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही ‘कॉस्मोपॉलिटीन सिटी’ म्हणून ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवडचा पहिल्या १० मध्ये क्रमांक लागतो. ‘स्मार्ट सिटी’मुळे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हींग) म्हणून आपली उद्योगनगरी विकसित होत आहे. शहारातील उच्चशिक्षित नागरिक जसे स्थानिक पायाभूत सुविधांबाबत जागरुक आहेत. तसेच जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी आग्रही आहे. खासदार तेजस्वी सूर्या यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘न्यू इंडिया व्हीजन’ ऐकण्याची पर्वणी या निमित्ताने पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध झाली आहे. ‘‘लोकल टू ग्लोबल कनेक्ट वुईथ तेजस्वी सूर्या’’ असा हा कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

भारतीय संसद भवनामध्ये आणि राजकीय क्षेत्रात आपल्या घणाघाती आणि अभ्यासपूर्ण वत्कृत्वशैलीमुळे अल्पावधीत युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेले देशातील युवा नेतृत्व म्हणून खासदार तेजस्वी सूर्या यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूर्या यांचे अनेकदा कौतूक केले आहे. फाईव्ह ट्रिलिअन इकॉनॉमी, स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, २०१४ पूर्वीचा आणि नंतरचा भारत, जी-२० मधील भारताचे प्रतिनिधीत्व, गुड गर्व्हनन्स, डीजिटल इंडिया, भारतीय अर्थसंकल्प, तरुणांच्या अपेक्षा आदी विषयांवर तेजस्वी सूर्या यांचा प्रभावी अभ्यास आहे. ‘न्यू इंडिया व्हीजन’ च्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकारच्या समन्वयाने पिंपरी-चिंचवडमध्ये कशाप्रकारे विविध विकासकामे नियोजित आहेत, याबाबत ऊहापोह या कार्यक्रमाद्वारे होणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिली.