राष्ट्रवादीचे नाना काटे पोटनिवडणूक लढणारच ?

0
492

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकिसाठी महाआघाडीचा उमेदवार याबाबत अद्याप निर्णय बाकी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी प्रचार, संपर्क, गाठीभेटी बरोबरच थेट उमेदवारी अर्जसुध्दा घेतल्याने खळबळ उडाली आहे. काटे हे कोणत्याही परिस्थितीत रिंगणात उतरणारच, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून राहुल कलाटे यांचे नाव जवळपास निश्चित समजले जाते म्हणून काटे धास्तावले असून महाआघाडीचे काय व्हायचे ते होईल, पण निवडणूक रिंगणात उतरायचेच, असा निर्धार त्यांनी केल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याआधीच नाना काटे यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. नाना काटे यांनी 2014मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. महापालिकेत विरोधीपक्षनेते तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काटे यांचे कार्य सर्वश्रुत आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता. चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात नाना काटे यांचंदेखील नाव होतं. मात्र राष्ट्रवादीची पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे अर्ज विकत घेतला आहे.

राज्य विधानसभेेचे विरोधीनेते अजित पवार यांनी उमेदवारीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे आज दुपारी इच्छुकांच्या मुलाखती नंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे कलाटे यांनी शिवसेनेकडून आणि काटे यांनी राष्ट्रवादीकडून आपल्याला उमेदवारी मिळणारच असे समजून प्रचार सुरु केल्याने भाजमध्येही अस्वस्थता पसरली आहे. कलाटे आणि काटे हे दोन्ही अत्यंत तगडे उमेदवार समजले जातात, मात्र ते स्वतंत्रपणे लढले तर त्याचा भाजपला फायदा होणार आहे.