चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीसह, सासू, सासरे पोलिसांच्या ताब्यात

0
296

चिखली, दि. २० (पीसीबी) – पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करत खून केला. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी साडेसहा वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली.

श्वेता प्रवीण जाधव (वय २७, रा. जाधववाडी, चिखली) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. श्वेता यांचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले (रा. वानवडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्वेताचे पती प्रवीण काळुराम जाधव, सासरे काळुराम जाधव आणि सासू प्रमिला काळुराम जाधव (तिघे रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि त्याचे आई वडील हे श्वेता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घरातील इतर कारणांवरून त्यांचा छळ करत. शनिवारी सकाळी प्रवीण याने श्वेता यांचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रवीण याने श्वेता यांना मोशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयातून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथेही उपचार न झाल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.