नाना काटे यांच्याकडून बैठका, पदयात्रा अन् गाठीभेटीचा धडाका

0
230

चिंचवड, दि.१५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मंगळवारी (दि. १४) दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी नाना काटे यांनी वातावरण ढवळून काढले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज क्रांतीनगर, काशीद वस्ती, जवळकर नगर, भैरवनाथ नगर, आनंद नगर, अनंत नगर, प्रभात नगर, वैदु वस्ती, लक्ष्मी नगर, पिंपरी गुरव गावठाण, वेस्ट साईड काऊंटी, भालेकर नगर, अमृता कॉलनी, भाऊ नगर, शिवनेरी कॉलनी, काशीद नगर, देवकर पार्क, सुवर्ण पार्क आदी ठिकाणी नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नाना काटे यांच्या सोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व आरपीआयसह इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
मतदारसंघाच्या विविध भागांमध्ये आज दिवसभरात झालेल्या गाठीभेटी आणि पदयात्रांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून नाना काटे यांचे औक्षण केले जात होते. आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सजविण्यात आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून जात होता. विविध गल्ली व रस्त्यांवरून पायी चालत नाना काटे यांनी नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत नाना काटे यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. सर्वसामान्य नागरिक, मतदार आणि माता भगींनींकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रचाराच्या उत्साहात भरच पडत होती. आज दिवसभाराच्या प्रचारादरम्यान ‘राष्ट्रवादी पुन्हा’चीच प्रचिती आल्याने राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असल्याचे स्पष्ट झाले.
पिंपळे गुरवमध्ये जंगी पदयात्रा
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज (दि. १४) प्रभाग क्रमांक ४१, पिंपळे गुरव परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. सदर यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिल. पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक मतदार आणि घरापर्यंत पोहोचत या पदयात्रेद्वारे काटे यांनी मतदारांना अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन केले. पदयात्रेत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, तानाजी जवळकर, शाम जगताप, राजू लोखंडे, अरुण पवार, सागर परदेशी, अतुल काशीद, विष्णू शेळके, नितीन सोनवणे, साहेबराव तुपे, बाळासाहेब पिल्लेवार, बाळासाहेब सोनवणे, सतीश चोरंबले यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.