महाविकास आघाडीचे नेते अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोलेंची उपस्थिती
चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेची झालेली चिंचवडची पोटनिवडणूक जिंकायचीच असा निर्धार महाआघाडीने केलेला दिसतोय. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून अभूतपूर्व एकीचे दर्शन घडत आहे. शहर ते राज्य पातळीवरील नेते पूर्ण ताकदीने चिंचवड विधानसभेची जागा जिंकण्यासाठी ताकदीने मैदानात उतरले आहेत. अजित दादा पवार सातत्याने शहरात येत आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेस देखील त्यांच्या नेत्यांना घेऊन बैठका आयोजित केली आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी १० वाजता वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन मंंगल कार्यालयात
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून हे तीन प्रमुख नेते मार्गदर्शन कऱणार आहेत.
शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे अत्यंत चुरस निर्माण झालेल्या या निवडणुकित मतविभागणीचा फायदा भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना होणार असल्याच्या बातम्या आणि विश्लेषण आहे. त्या पार्श्वभूमिवर आता महाआघाडीचे नेते सक्रीय झाले असून तीनही पक्षांची गठ्ठा मते नाना काटे यांच्या मागे राहतील यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषतः अजित पवार यांनी जातीने लक्ष घालून एकत्र प्रचारासाठी ही मोट बांधली असून ते तळ ठोकून बसणार असल्याचे सांगण्यात आले.
बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या मागे शिवसेनेचे अमित गावडे, विशाल यादव यांच्यासह काही नगरसेवक असल्याने शिवसेनासुध्दा त्यांच्या मागे असल्याचे भासवले जाते. शिवसेनेचा कलाटे यांना आतून पाठिंबा असल्याचाही प्रचार सुरू आहे. यापूर्वी २०१९ मध्ये शिवसेनेकडून अपक्ष म्हणून सर्व पक्षांचा पाठिंंबा होता तसाच आताही असल्याचे वातावरण कलाटे यांच्याकडून निर्माण केले जात आहे. काही शिवसेनेचे पदाधिकारीसुध्दा कलाटे यांच्याबरोबर आढळल्याने नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आदित्य ठाकरे येत आहेत. आता उध्दव ठाकरे यांच्या वतीने आदित्य ठाकरे जाणीवपूर्वक उपस्थित राहणार आहेत. ते काय बोलतात, कलाटे आणि त्यांच्या बरोबरच्या माजी नगरसेवकांची हकालपट्टी कारवाई करतात की नाही याकडे लक्ष लागन राहिले आहे.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांनी सुरवातीला थोडी वेगळी भूमिका घेतली होती. आगामी महापालिका निवडणुकित महाआघाडी करायची असेल तर प्रथम जागावाटपाचे सूत्र निश्चित करा आणि नंतरच प्रचारात उतरणार, अशी अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या काँग्रेसबाबत संभ्रमाचे वातावरण होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना काटे हे स्वतः त्याबाबत महाआघाडीमधील काँग्रेसचा रोल काय असेल ते सांगणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचेही या मेळाव्याकडे लक्ष आहे.
महाविकास आघाडीतील इतर अनेक पक्षांनी आपली उमेदवारी मागे घेत नाना काटे यांना समर्थन देत प्रचारात सक्रिय होण्याचा निश्चय केला आहे. शिवसेना पक्ष देखील या निवडणुकीत नाना काटे यांच्याच बरोबर असून स्वतः युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे चिंचवड मध्ये दाखल होत कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नाना पटोले यांचे देखील या सभेत भाषण होणार आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचे तीन प्रमुख नेते एकाच मंचावर येणार म्हटल्यावर महाराष्ट्रभर या विषयाची चर्चा रंगणार आहे.