महाआघाडीचे रथीममहारथी भाजपच्या वाटेवर, आमदार श्रीकांत भारतीय यांचा मोठा गौप्यस्फोट

0
402

पंढरपूर, दि. १३ (पीसीबी) : राज्यातील जनतेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, त्यामुळे जनमताच्या जोरावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये येतील. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही शिल्लक राहणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय यांनी केला.

भाजपच्या महाविजय-२०२४ मशिनच्या प्रदेश संयोजकपदी भारतीय यांची निवड झाली आहे. निवडीनंतर सोमवारी (ता. १३ फेब्रुवारी) ते प्रथमच विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यात सत्ता मिळवेल, असा आशावादही व्यक्त केला. या वेळी आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, भाजपचे राजाभाऊ जगदाळे, प्रणव परिचारक, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, डाॅ. बी. पी. रोंगे, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे आदी उपस्थित होते.

भारतीय म्हणाले की, नाशिक येथे नुकत्याच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारी समितीच्या बैठकीत निवडणुकी संदर्भात अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. ‘अब की बार दो सो पार’ अशी घोषणाही करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारी लागण्याचे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सोशल मीडियाचा अधिक वापर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चिन्हावर लढवण्याचा शेवटपर्यंत आग्रह राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये मोदींविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर भाजप व मित्र पक्ष जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही. दोन्ही जागांवर भाजप सहज विजय मिळवेल. कितीही घरोघरी जाऊन प्रचार केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत, तर काही प्रमुख नेते भाजपात येण्यास इच्छुक आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक नेते भाजपत येतील, असा मोठा गौप्यस्फोटही भारतीय यांनी केला.