LPG चा मोठा तुडवडा …स्थलांतरित कामगार गावाकडे परतले!

0
1

दि.२१(पीसीबी)-पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम गुजरातमधील सुरत शहरावर होताना दिसत असून, एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे हजारो स्थलांतरित कामगार गावाकडे परतू लागले आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कामगारांना स्वयंपाकासाठी आवश्यक इंधन मिळत नसल्याने त्यांच्या दैनंदिन जगण्यावर मोठा परिणाम झाला आहे.

उधना रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने कामगारांनी गावाकडे परतण्यासाठी गर्दी केली. अनेक कामगारांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून गॅस मिळत नसल्यामुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे. गॅसचे दर तब्बल ५०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्याने तो परवडत नसल्याची तक्रार त्यांनी केली. काही उद्योगधंदेही बंद पडत असल्याने उत्पन्नाचे साधनही कमी झाले आहे.

या परिस्थितीमुळे सुरतच्या वस्त्रोद्योगावरही परिणाम झाला असून कामगारांच्या कमतरतेची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पश्चिम आशियातील परिस्थिती लक्षात घेऊन ऊर्जा सुरक्षेसाठी आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध देशांशी समन्वय सुरू ठेवला आहे. तसेच या संकटामुळे प्रभावित निर्यातदारांसाठी ४९७ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “ही परिस्थिती संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक आहे. भारत सरकार सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.” दरम्यान, एमटी शिवालिक आणि एमटी नंदा देवी ही भारतीय ध्वजधारी एलपीजी जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारतात पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर हा संघर्ष तीव्र झाला. त्यानंतर इराणने आखाती देशांमधील अमेरिकन आणि इस्रायली ठिकाणांना लक्ष्य केले असून, होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरतसारख्या औद्योगिक शहरांमध्ये गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.