पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – क्रिप्टो मधील गुंतवणूक एका व्यक्तीस चांगलीच महागात पडली आहे. व्यक्तीने क्रिप्टो मध्ये गुंतवणूक केल्यानंतर अवघ्या पावणे सहा तासात गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम जमा झालेला खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख व्यक्तीस दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार बनावट असून आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदार व्यक्तीच्या लक्षात आले. हा प्रकार १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी सव्वाचार ते रात्री साडेनऊ या कालावधीत घडला.
अभिषेक कमलकुमार माथूर (वय ४३, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक धारक, बनावट वेबसाईट धारक, टेलिग्राम आयडी धारक, युपीआय आयडी धारक, बँक खाते धारक अशा आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी माथूर यांना एका व्हाट्सअप क्रमांकावरून मेसेज आला. समोरील व्यक्तीने माथूर यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये घेतले. तिथे त्यांना क्रिप्टो अकाउंट सुरु करण्यास सांगून ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार माथूर यांनी १४ लाख ४८ हजार ९०० रुपये क्रिप्टो करन्सीमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केली. गुंतवणूक करताच त्यांच्या क्रिप्टो अकाउंटला २८ लाख ८० हजार रुपये जमा झाल्याचे दिसले.
त्यानंतर माथूर यांनी जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे काढता आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माथूर यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.