भारत दि. १५ (पीसीबी) – ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आंतररष्ट्रीय हॉकी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यत काही महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शहरात क्रीडा स्पर्धासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिमय, क्रीडांगण, रोईंग सेंटर, बॅडमिटन कोर्ट, स्केटींग रिंग, कुस्ती प्रशिक्षण केंद्र, जलतरण तलाव, सिथेंटीक ट्रॅक तसेच, क्रीडा सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात स्पोर्टस हबची निर्मिती करण्यासाठी महापालिकेची दिशा निश्चित केली होती. महापालिका व खासगी शाळा तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थी-खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. रोईंग, हॉकी, कुस्ती, कबड्डी, टेनिस, बॅडमिंटन, शूटींग, धुनर्विद्या खेळासाठी प्रशिक्षण केंद्र सुरूही करण्यात आले आहेत. त्याला खेळाडूंचा प्रतिसाद मिळत आहे.
शहरात खेळांसदर्भात जागृती निर्माण व्हावी, स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ पाहता यावा म्हणून सहा देशांची कनिष्ठ पुरूष गट हॉकी स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे नोव्हेंबर 2022 ला करण्यात येणार होते. त्यासाठी तब्बल साडेपाच कोटी रूपये खर्च करून प्रकाश व्यवस्थेसाठी चार खांब्यावरील दिवे बदलण्यात आले. तसेच, सुमारे पाच कोटी खर्च करून स्टेडियमध्ये पुन्हा सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात होणारी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आयोजनासंदर्भात हॉकी इंडिया महासंघाशी पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच ओडिसामध्ये हॉकीचा विश्वचषक सुरू आहे. स्पर्धेला अव्वल संघ असावेत यामुळे शहरातील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत.