मुंबई, दि. १४ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयात एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. याचदरम्यान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बीबीसी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात आयकर विभागाचे छापे प़डले आहेत. यावरुनच ठाकरेंनी प्रसारमाध्यमांवरील धाड ही कोणत्या लोकशाहीत बसते असा सवाल उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
रायगडमधील काही मुस्लिम पदाधिकार्यांनी उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. यावेळी आय़ोजित पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे म्हणाले, देशात, राज्यात सध्या जे काही सुरु आहे, त्याविरोधात एकत्र यायला हवं. लोकशाही वाचविण्याच्या उद्देशाने एकत्र येणं गरजेचं आहे. एक लढा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी दिला तर आता स्वातंत्र्य वाचविण्यासाठी लढा द्यायचा आहे असंही ठाकरे म्हणाले.
देश वाचविण्यासाठी लोक शिवसेनेत येत आहे. आपण आज आपण एकत्र आलो नाहीत तर देश खाऊन टाकतील अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.तसेच निवडणुकीच्या तोंडावर वंदे भारत , वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जाताहेत, प्रधानंमंत्री उद्घाटने करताहेत. मात्र, याचवेळी भारतमातेला गुलाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक लढा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी दिला तर आता स्वातंत्र्य वाचविण्यासाठी लढा द्यायचा आहे असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुढे ठाकरे म्हणाले, गेल्या चार पाच महिन्यांत मातोश्री किंवा शिवसेना भवन येथील माणसांची रीघ वाढतेच आहे. आता मुस्लिम पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. यानंतर माझ्यावर टीका होऊ शकते. पण मुस्लिमांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे हिंदुत्व सुटत नाही. आणि तसं असेल तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे मस्जिदीमध्ये गेले होते ते काय होतं अशा सवालही उपस्थित केला आहे.