पुणे, दि. १७ (पीसीबी) : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा, चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. याचदरम्यान, आता पुणे पोलिसांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी कारवाई केली असून ५२१ जणांना अटक केली आहे.
पोलीस आयुक्त रितेशकुमार कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.१५) विशेष मोहीम राबविली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाई करून ३ हजार ७०७ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. यावेळी गंभीर गुन्ह्यातील तब्बल ५२१ जणांना अटक करण्यात आली आहे. महाशिवरात्र ,शिवजयंती तसेच कसबा पोटनिवडणुकीच्या धर्तीवर या धडक कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री ९ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शहरातील, ५४४ हॉटेल, लॉजसह पीएमपी बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक ठिकाणी नाकाबंदी करून एक हजार ४८५ वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. तसेच ५३८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींनी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
पुणे पोलीस दलाच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. गंभीर गुन्ह्यातील ५२१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्रसाठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने टांझानियातील एकाकडून २३ लाख २६ हजारांचे कोकेन जप्त केले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंढव्यातील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा नारायण शिरगावकर आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.