चिंचवडमध्ये 10 हजार मतदार 80 वर्षांपुढील, टपाली मतदान करता येणार

0
381

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाने 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात 80 वर्षांवरील 9 हजार 926 तर 1 हजार 500 दिव्यांग मतदार असून आतापर्यंत 189 जणांनी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज भरून दिल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार सुविधा केंद्रीत निवडणुकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने चिंचवड विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, शारीरिक विकलांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात येत आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी 80 वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जागृती करत आहेत. अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून नमुना 12-डी अर्ज भरुन घेत आहेत. अशाप्रकारचा अर्ज चिंचवडमधून आतापर्यंत 189 नागरिकांनी भरून दिला आहे. जास्तीत-जास्त मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, त्याकरिता नमुना 12-डी अर्ज भरून देण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी केले आहे.