IAS अधिकाऱ्याच्या मुलीची १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

0
232

मुंबईतल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. रस्तोगी यांची मुलगी वकिलीचं शिक्षण घेत होती.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.

लिपी रस्तोगी ही LLB करत होती. वयाच्या २७ व्या वर्षी तिने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं आहे. त्याआधी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे असंही कळतं आहे मात्र त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे. या मुलीची आई राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत.

मुंबईत मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगीने आत्महत्या केली. ज्या इमारतीत लिपी आणि तिच्या आई वडिलांसह राहात होती तिथे आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली, ज्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.