मुंबई, दि. ४ (पीसीबी) – गाईंना इंजेक्शन देवून बेशुद्ध करत आणि त्यानंतर गायीची कत्तलीसाठी वाहतूक केली जात. या टोळीला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी सहा आरोपींना अटक करत 25 लाख 20 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोसीन बाबु कुरेशी (वय 28 रा.ठाणे), मोहम्मद शाहिद रहेमान (वय 42 रा.ठाणे), हाशिम मोहम्मद अब्दुल रहेम कुरेशी (वय21), अशरफ सुलेमान कुरेशी (वय 32), मोहम्मद अरिफ सुलेमान कुरेशी (वय 52, सर्व रा. ठाणे), सोहेल फारूक कुरेशी (वय 33, रा. धारावी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तपासात नऊ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी आळंदी परिसरात गाईंना बेशुद्ध करत त्यांना कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाण वाढले होते. याच अनुशंगाने तपास करत असताना 28 डिसेंबर रोजी दिघी येथे नंबरप्लेट नसलेली कार संशयीतरित्या फिरताना दिसली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता, कार घेउ आरोपी कच्च्या रोडकेडे गेले व तेथून गाडी तेथेच सोडून ते टाटा कम्युनिकेशनच्या जंगलात पळून गेले. गाडी ला नंबरप्लेट नव्हती मात्र पोलिसांनी गाडीच्या इंजिनच्या नंबरवरून मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी ही गाडी सहा जणांना विकली असून सध्या तिचा मालक हा मोशिन कुरेशी असून तो मिरारोडला राहतो. त्यानुासर पोलिसांनी 19 जानेवारी रोजी मोशीनचा मोबाईलनंबर पोलिसांनी मिळवला व तांत्रिक तपासाद्वारे त्याच्या इतर साथिदारांची नावे ही निष्पन्न केली गेली.
त्यानंतर 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांनी मुंबई येथे जात एक एक करत सहा आरोपींना अटक केले. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन चार चाकी गाड्या, दोन सत्तुर, तीन कोयते, रस्सी,लोखंडी कानस, पिशवी, इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, नंबर प्लेट असा एकूण 25 लाख 20 हजार 980 रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीवरील एकूण 13 गुन्हे उघडकीस आणले. यात दिघी येथील तीन, पिंपरीतील तीन, भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, देहुरोड पोलीस ठाणे, वाकड, खेड, कोंढवा व हडपसर येथील प्रत्येकी एक अशा गुन्ह्यांची उघड करण्यात आली. आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता 7 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई दिघी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस हवालदार चिंतामण फलके, प्रदिप खोटे, किशोर कांबळे, सतीष जाधव, पोलीस नाईक बाळासाहेब विधाते, किरण जाधव, नवधिरे, दौंडकर, पोलीस शिपाई रामदास दहिफळे, बबाजी जाधव, शिंदे, महिला पोलीस भाग्यश्री जमदाडे यांनी केली