पिस्टल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक, १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
225

हिंजवडी, दि. २० (पीसीबी) – कारमधून पिस्टल घेऊन जाणाऱ्या चौघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि कार असा एकूण १२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १९) पहाटे तीन वाजता बावधन येथे करण्यात आली.

संदीप उर्फ भैय्या दशरथ तुपे (वय २७, रा. इंदापूर), किरण नवनाथ गोरे (वय २६, रा. वाकड), महेश शिवाजी कुंभारकर (वय २६, रा. वाकड), रोहन लक्ष्मण लोंढे (वय २२, रा. वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विनोद वीर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे एका कारमधून चौघेजण जात असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३५ हजारांचे एक पिस्टल, ५०० रुपयांचे एक जिवंत काडतूस आणि १२ लाख रुपये किमतीची एक कार जप्त केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.