पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असताना अधिकाऱ्यांचे दौरे मात्र जोरात सुरू आहेत. जानेवारी महिन्यातील दुबई दौऱ्यानंतर आता महापालिकेच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी सुरत दौ-यावर गेले आहेत.
या दौऱ्यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता मनोज सेठिया, जलनिःसारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, प्रमोद ओंभासे या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी गुजरातमधील सुरत महापालिकेच्या विविध उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. दि. 30 जानेवारी 2 फेब्रुवारी हा दौऱ्याचा कालावधी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे मालमत्ता कर, बांधकाम परवानगी, पाणीपट्टी, आकाश चिन्ह परवाना विभाग आहेत. मात्र, कर संकलन विभाग वगळता इतर विभागांचे उत्पन्न वाढीस मर्यादा आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून सुरत महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर गेले आहेत. सुरत महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या जागेवर 400 ते 500 लहान-मोठे हॉल उभारून भाड्याने देण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीसाठीही विशेष मॉडेल तयार केले आहे. यासह उत्पन्न वाढीचे विविध दर्जेदार असे स्त्रोत निर्माण केले आहेत. त्यामुळे भविष्यात पिंपरी महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी हा दौरा फलदायी ठरतो की नाही हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.