चिंचवड, दि १९ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीच्या नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कामठे यांनी हातावर घड्याळ बांधले.
पिंपळेनिलख येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, शहाराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत तुषार कामठे हे भाजपकडून पिंपळेनिलखमधून निवडून आले होते. पाच वर्षाच्या काळात कामठे यांनी विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आवाज उठविला होता. महापालिकेतील भाजपाच्या चुकिच्या कामांविरोधात कामठे नेहमी आक्रमकपणे बोलत होते. कामठे यांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.
आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराची धामधूम सुरु आहे. अशातच चिंचवड मतदारसंघातील पिंपळेनिलखचे माजी नगरसेवक असलेल्या कामठे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दोनदिवपांसपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज कामठे यांनी हातावर घड्याळ बांधले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपला धक्का बसला आहे.