मुलांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्याची संधी द्या : रेणू गावस्कर

0
419

तनुश्री स्नेह मेळाव्यात मोहन आगाशे, संकर्षण खराडे यांची उपस्थिती

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांना उद्यान, क्रीडांगण, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणी शक्य तेवढा जास्तीत जास्त काळ वावरण्याची संधी दिली पाहिजे. त्यातून लहान मुलांचे भाषा कौशल्य व समूहाने राहण्याची कला विकसित होते. मागील तीन वर्षात कोरोनाच्या बंधनामुळे लहान मुलांना शाळेत व सार्वजनिक ठिकाणी जास्त जाता आले नाही. लहान बाळांवर संस्कार करण्यासाठी आई वडिलांबरोबरच कुटुंबातील इतर सभासदांनी देखील थोडा जास्त वेळ दिला पाहिजे आणि सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी केले.

नवी सांगवी येथे स्व. मनसुखलालजी गुगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहाव्या स्नेह मेळाव्यात आयोजित केलेल्या तनुश्री मोफत गर्भ संस्कार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गावस्कर बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आयोजक डॉ. अनिल गुगळे, डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. तन्वी गुगळे, अभिनेता संकर्षण खराडे, डॉ. सुनंदा रानडे, हिमांशू बक्षी, संजीवनी दीदी, डॉ. गिरीश पटेल, सुविनय दामले, मकरंद टिल्लू, शिवानी सोनार आदीं उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच संकर्षण खराडे यांनी कविता वाचन करून मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. स्वागत प्रास्ताविक करताना डॉ. सुप्रिया गुगळे यांनी सांगितले की, गर्भसंस्कार द्वारे नितिमान पिढी निर्माण करण्यासाठी पालकांना मदत करणे, तसेच गर्भवती महिलांना त्यांची अंतस्थ शक्ती जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे. या साठी मेळाव्याचे आयोजन केले जाते. पूर्वीच्या काळी आई होणाऱ्या स्त्रीला एकत्र कुटुंब पद्धतीत मार्गदर्शन मिळत असे. आता विभक्त कुटुंब पद्धती मुळे ते मार्गदर्शन मिळतच नाही.

आम्ही या परंपरा पुनर्जीवित करण्यासाठी तसेच माता व बालक यांच्यातील पवित्र नात्याचे संगोपन करण्यासाठी पालकांना मूल मार्गदर्शक तत्वे शिकवून, त्यांना सुजाण पालक बनवून दोन पिढीतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. हा उपक्रम गेल्या ९ वर्षापासून सातत्याने चालविला जात आहे असे डॉ. गुगळे यांनी सांगितले. यावेळी गर्भसंस्कार कार्यशाळेचा लाभ घेतलेल्या मातांनी आपले अनुभव कथन केले. सूत्र संचालन विनया देसाई यांनी केले तर आभार मनोज मुनोत यांनी मानले.