मिझोराम राज्यातील एकीसह पाच तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका

0
260

पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचा छापा

पिंपळे सौदागर, दि. १७ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील काटे वस्ती येथे असलेल्या एज लाईन टच द ब्युटी नावाच्या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यात मिझोराम राज्यातील एक आणि महाराष्ट्रातील चार अशा पाच तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

स्पा मॅनेजर शाकीर समीरउद्दीन अहमद (वय २६, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. आसाम) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह पांडे चंकी धर्मेंद्र (वय २२, रा. काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुधा टोके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाकीर अहमद हा काटे वस्ती येथे स्पा सेंटर चालवत होता. त्याने काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर बनावट गिऱ्हाईक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यामध्ये स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री झाली. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून पाच तरुणींची सुटका केली. त्यामध्ये की तरुणी मिझोराम तर चार तरुणी महाराष्ट्रातील आहेत.

स्पा सेंटरच्या जवळच दोन रुग्णालये आणि एक शाळा आहे. रुग्णालये आणि शाळांच्या बाजूला हा प्रकार सुरु असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, पेटीएम स्कॅनर आणि इतर साहित्य असा ११ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुधा टोके, मारुती करचुंडे, सागर सूर्यवंशी, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी केली आहे.