माथाडीचे काम करण्यासाठी गुगल पेवर दहा हजारांची खंडणी

0
246

वाकड, दि. १३ (पीसीबी) – माथाडीचे काम करता यावे म्हणून दोघांनी एका व्यक्तीकडून दहा हजार रुपये खंडणी गुगल पेवर घेतली. त्यानंतर आणखी जास्त खंडणी मागितल्याने व्यक्तीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. ही घटना नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत प्रेस्टिज प्रोलाईफ स्क्वेअर, वाकड येथे घडली.

संतोष रंगराव चव्हाण (वय ४०, रा. वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ११) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय काशिद, प्रविण यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांना अक्षय काशीद आणि प्रवीण यादव यांनी जीवे मारण्याची धमकी देत वाकड परिसरात माथाडीचे काम करता यावे यासाठी दहा हजार रुपये खंडणी मागितली. त्या धमकीला घाबरून चव्हाण यांनी प्रथम पाच हजार रुपये आणि त्यानंतर पाच हजार रुपये अक्षय काशीद याच्या गुगल पेवर पाठवले. ही खंडणी घेतल्यानंतर दोघांनी चव्हाण यांच्याकडे हप्ता वाढवून मागितला. त्यामुळे चव्हाण यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद नोंदवली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.