EVM चोरीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

0
247

पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये ‘ईव्हीएम’मधील कन्ट्रोल युनिटची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. याची तत्काळ दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी (DySP) यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केल्यानंतर त्याचा अहवाल तत्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याचा आदेश दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर मुख्य सचिवांनी या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनीही तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सासवड स्ट्राँग रूममधून चोरी
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील तहसील कार्यालयात स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या. सोमवारी सकाळी तहसील कार्यालय उघडले तेव्हा स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडलेले आढळले. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे ही चोरी या दोन दिवसांत झाल्याचा संशय आहे. ईव्हीएममधील कन्ट्रोल युनिट चोरीला गेल्याने अचानक खळबळ उडाली आणि प्रकरण थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले.

कन्ट्रोल युनिटची चोरी कशासाठी?
EVM मशीनमधील कन्ट्रोल युनिटच्या चोरीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 तासांतच दोघांना अटक केली. या दोघांना जेजुरीमधून अटक करण्यात आली आहे. तरीही प्रश्न उपस्थित होतोय की या चोरांनी EVM मशीनमधील कन्ट्रोल युनिटची चोरी का केली? यातून चोरांना काय साध्य करायचे होते, याची उत्तरे पोलिस शोधत आहेत.EVM मशीन असलेल्या स्ट्राँग रूमबाबत हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याचा ठपका तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी (DySP) यांच्यावर ठेवला आहे. या संदर्भातील विस्तृत अहवाल १२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

चौकशी समितीची स्थापन
ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक समितीचे सदस्य आहेत. ही समिती एका आठवड्यात अहवाल सरकारला सादर करणार आहे.

दरम्यान, पुणे काँग्रेसने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. EVM मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ तसेच तारीख प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने या याचिकेत केली आहे.