आमदार जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असतानाही भाजपने स्वार्थीपणा केला

0
369

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आघाडीचा मेळावा चिंचवडला आज झाला. यावेळी अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. चिंचवड आणि कसबापेठचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना त्यांची प्रकृती गंभीर असताना रुग्णवाहिकेतून मुंबईला विधानपरिषद आणि राज्यसभेची निवडणूक जिंकण्याकरिता मतदानासाठी नेल्याबद्दल त्यांनी भाजपवर आसूड ओढला. दरम्यान, अजितदादांच्या या खरमरीत टीकेमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून भाजपचे नेते संतापले आहेत.

चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या चिंचवड येथील मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे,या पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आऱपीआयचे (गवई गट)डॉ. राजेंद्र गवई,चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे निरीक्षक व पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे,कॉंग्रसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम,शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले आदी व्यासपीठावर होते.

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जोडीने भाजपवरही अजित पवार यांनी ३५ मिनिटांच्या आपल्या भाषणात कडाडून टीका केली. जीवघेण्या आजाराशी झुंज देत असलेले आ. जगताप आणि टिळक यांना विधानपरिषद,राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पु्ण्याहून मुंबईला रुग्णवाहिकेतून नेऊन भाजपने स्वार्थीपणा केला,असा हल्लाबोल यावेळी केला.त्यांना ही दगदग सहन होत नव्हती,पण ते पक्षासाठी गप्प राहिले. पण,पक्षापेक्षा जीव महत्वाचा आहे, हे या दोन्ही आमदारांना भाजपने सांगायला पाहिजे होते, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्येही २०१७ पर्यंत भाजप दोन-तीन नगरसेवकांपुरता मर्यादित होता, मात्र, फोडाफोडीच्या त्यांच्या देशभरातील राजकारणामुळे ते इथेही सत्तेत आले, असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रात भाजप ही शिवसेनेमुळे वाढली. त्यांच्याशी असलेल्या युतीतून ती ग्रामीण भागात पोचली आणि आता तिनेच या शिवसेनेला दूर केल्याची खंत पवारांनी व्यक्त केली.

चिंचवडमध्ये आघाडीत (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही ती औरंगाबादमध्ये झाल्याचा किस्सा यावेळी सांगितला. या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात आघाडीत (राष्ट्रवादी) बंडखोरी झाली.चिंचवडप्रमाणे त्या बंडखोराचीही समजूत काढण्याचा प्रयत्न मी वगळता सर्वांनी केला. कारण मला समजून सांगता येत नाही,असे ते म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. बरं झालं मी या बंडखोराला फोन करूनही तो लागला नाही,असे ते पुढे म्हणताच आणखी हशा झाला.चिंचवडप्रमाणे औरंबादमध्येही बंडखोराने माघार घेतली नाही.पण,त्याची परिणती त्याला अवघी चारशे मते मिळण्यात झाला, असे सांगत चिंचवडमधील बंडखोराचीही अशीच गत होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.