शंकर जगताप चिंचवडचे निवडणूक प्रभारी

0
359

– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले जाहीर

पुणे, दि. ४ (पीसीबी) – “चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील आणि शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर अश्विनी जगताप प्रमुख असतील असे ठरले होते आणि आता पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो”, असे स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले.

अधिकृत उमेदवारांच्या घोषणेनंतर पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत संबंधित आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याची परंपरा आहे. त्यानुसारच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. मात्र कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही. येथे टिळक कुटंबाबाहेरील हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तर चिंचवडमधून आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

येथे भाजपने टिळक कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबत भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्यांचे कारण सांगितले. चंद्रकात पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फंडणवीस यांनी मी शुक्रवारी रात्री टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करुन कसबा पेठेतील उमेदवार दिला आहेत. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्यावर नवीन जबाबदारी दिलीय. त्यांना भाजप सन्मानाचं स्थान देणार आहे. त्यांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार असल्याचं सांगितलं.”

चिंचवडमधील जागेवरून जागताप कुटंबियांत वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे, याबाबत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी जगताप कुटुंबियांत कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असं स्पष्टंच सांगितलं.
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “जगताप कुटुंबियांत उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. जगताप यांचा मुलगा लहान असला तरी त्यांनी मोठा समजदारपणा दाखविला आहे. समाजात पसरत असलेल्या अफवांबाबत त्यांनी ट्वीट करून कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं सांगितलं आहे.”