राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे चार मजले ईडीनं केले जप्त

0
251

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे मुंबईतील चार मजले सक्तवसुली संचालनालयानं जप्त केले आहेत. इक्बाल मिर्ची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ईडीने धक्का दिला आहे. दरम्यान, कोल्हापूर येथे दुसरे राष्ट्वादीचे नेते हसन मुश्रीफ यांंच्यावरही जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कारवाई सुरू असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता ईडीनं सील केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वत: ही माहिती दिली आहे. सील करण्याची कारवाई मागील वर्षीच करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून न्यायनिर्णय प्राधिकरणानं त्यास दुजोरा दिला आहे.

सील करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजल्यांचा समावेश आहे. हे चारही मजले पटेल कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत.

ऑक्टोबर २०१९ मध्ये या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची १२ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती. पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीनं सीजे हाऊस बिल्डिंग बांधली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीनं मागील वर्षी सील केले आहेत. याच प्रकरणात डीएचएफएलचे वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांची चौकशी झाली असून कपिल वाधवान अटकेत आहे, तर धीरज वाधवान जामिनावर आहे.