DP वर पिंपरी कॅम्पातून हरकतींचा पाऊस

0
4

– आम्हाला पुन्हा निर्वासीत करण्याचा डाव हाणून पाडू – व्यापाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
पिंपरी, दि . २५ ( पीसीबी )  –
पिंपरी चिंचवड शहर सुधारीत विकास आराखड्यावर हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. बाजारपेठेतील रस्ता रुंदिकरणामुळे असंख्य निवासी आणि व्यापारी इमारतींची अवस्था अत्यंत बिकट होणार असल्याने पिंपरीतील सर्व सिंधी बांधवांनी विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुदिकरणाला कडवा विरोध दर्शविला आहे. कायदेशीर मुद्दे उपस्थित करून एकूण ४२०० हरकतींचे अर्ज तयार केले असून आज १७०० अर्ज प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. पिंपरी कँम्प मर्चंट असोसिशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी मंडळींनी महापालिका भवनातील नगररचना विभागाकडे हरकतींचे अर्ज दिले.
विकास आराखड्यात प्रामुख्याने रस्ता रुंदिकरणाला विरोध दर्शविला आहे आणि संपूर्ण परिसर दाट लोकवस्ती म्हणून घोषित कऱण्याची मागणी केली आहे. रस्त्यांचे रुंदिकरण केले तर जागाच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे.
– माध्यमांशी बोलताना श्रीचंद आसवाणी म्हणाले, ७५ वर्षांपूर्वी आम्ही पाकिस्तानातील जमीन, जुमला सोडून नेसत्या कपड्यासह भारतात आलो. निर्वासीत म्हणून केंद्र सरकारने जागा दिली. स्वकष्टाने आम्ही बाजारपेठ उभी केली. आज तीन-चार पिढ्यांनी त्याला शहराची मध्यवर्ती मोठी बाजारपेठ म्हणून ती नावारुपाला आली. आता तिथे सोयीसुविधा न देता रुंदिकऱणाचा प्रस्ताव डिपी मध्ये टाकला. तसे झाले तर दुकान आणि घरासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. आम्हा सिंधी बांधवांना पुन्हा एकदा निर्वासीत करण्याचा या आराखड्यातील खेळी आहे. आम्ही त्यासाठी संघटितपणे हरकतीचे मुद्दे उपस्थित केले आहेत. पिंपरी बाजारपेठेतील रस्ते १८ मीटर रुंदिकरणाचे नियोजन केले, तसे चिंचवड, भोसरी गावठाणात कुठेही केलेले नाही. आम्हाला टार्गेट कऱण्याचा हा डाव आहे.

रस्ता रुंदिकऱणात १) साई चौक, शनी मंदिर – वैष्णव देवी मंदिर ते लाल बहादूर शास्त्री गार्डन दरम्यानचा रस्ता १८ मीटर रुंदीकरण, २) लाल बहादूर शास्त्री गार्डन ते साधू वासवानी रोड चौक १८ मीटर रस्त्याचे रुंदीकरण, ३) लाल बहादूर शास्त्री गार्डन ते अशोक थिएटर – १२ मीटर रस्त्याचे रुंदीकरण, ४) अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्ता १२ मीटर रस्त्याचे रुंदीकरण, ५) साईचौक पिंपरी ते भाटनागर चौक- १८ मीटर रस्ता रुंदीकरण, ६) रेल्वे स्टेशन (साई बाबा मंदिर क्रांती रिक्षा स्टँड) ते स्वर्गीय किम्मतराव अडवाणी अंडरपास – १२ मीटर रस्त्याचे रुंदीकरण, ७) रिव्हर रोड (स्टेट बँक ऑफ इंडिया) ते मिलिंद नगर- १५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण ते डिलक्स टॉकीज रोड ९ मीटर रस्त्याचे रुंदीकरण, ८) रवी सोसायटी ते अशोक थिएटर नवीन रस्ता – १२ मीटर, ९) एमपी कॉलेज समोरील कुदळे कॉलनी रस्ता ते औदुंबर अपार्टमेंट रस्ता – ९ मीटर रस्त्याचे रुंदीकरण, १०) वीर अभिमन्यू चौक (एमपी कॉलेज) ते तपोवन मंदिर रोड (माळी अली रोड) व्हाया औदुंबर अपार्टमेंट रोड १८ मीटर रुंदीकरण, ११) माळी आळी रोड ते महावीर क्लिनिक – १८ मीटर रस्ता रुंदीकरण, १२) काळेवाडी पूल (पवना नदी लगून) ते पवनेश्वर मंदिर पूल – नवीन रस्ता १८ मीटर, १३) जयहिंद कॉलेज रस्ता, वैभवनगर रस्ता १०-१२ मीटर होते ते १८ मीटर.