फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नाही….

0
324

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : पहाटेच्या शपथविधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचं सांगतानाच मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे, असा सूचक इशाराही देवेंद्र फडणवीसयांनी दिला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, शरद पवार यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर भाष्य केलं नसून फडणवीस यांचं महत्त्व वाढवायचं नसल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितल्याचं म्हटलं आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. तेव्हा, त्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावसं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. फडणवीस यांनी हा विषय इतक्या दिवसांनी का काढला हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार हे चिंचवडमध्ये प्रचाराला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला उमेदवार भेटले. मतदारसंघात एखादी चक्कर टाका असं ते म्हणाले. बघू काय करायचं ते. पण एका ठिकाणी गेलं तर दोन ठिकाणी जावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

आसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. त्यावरून त्यांनी आसाम सरकारवर टीका केली. 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत. हे संपूर्ण देशाला माहीत आहे. असं असतानाही ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याविषयी काय सांगायचं? असं ते म्हणाले.

बापट यांच्या यातना वाढवू नये

भाजप नेते गिरीश बापट यांची काल कसब्यात सभा झाली. नाकाला ऑक्सिजन लावूनच ते सभेला आले होते. त्यावरही पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गिरीश बापट यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्या यातना वाढवू नये ही अपेक्षा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी मंगळवारी होणार असल्याचं मी ऐकलं आहे. बघू आता मंगळवारी काय होतं, इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे, असंही ते म्हणाले.

धंगेकर पवारांना भेटल

दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातील निवासस्थानी त्यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार येत्या 22 तारखेला कसब्यासाठी प्रचारात उतरणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे