कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करु नका; हौसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी

0
184

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांचा कर माफ करावा. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांना मालमत्ता कर भरता आला नाही. त्यामुळे त्यांची मालमत्ता सील करु नका, अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिकेकडे केली.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात सांगळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी -चिंचवड शहरातील अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील कर्ता सदस्य मरण पावल्याने त्या घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे. अशा सदस्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मालमत्ता कर भरता आलेला नाही. सद्यपरिस्थितीत महापालिकेने थकीत मालमत्ताकर धारकांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहिम चालू केली आहे. ज्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा सदस्यांवर अवलंबून असणाऱ्या सदस्यांना एकवेळ मालमत्ता कर माफ करून त्यांच्यावरील कारवाई थांबवावी.

मागील कोरोनाच्या भयंकर अशा संकटात आमच्या सोसायट्यांमधील तसेच शहरातील इतर नागरिक यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या ही कुटुंबं कमकुवत झालेली आहेत. त्यातच महापालिकेने अशा कुटुंबाचा देखील मालमत्ताकर थकीत असल्याने यांना जप्तीच्या नोटिसा देऊन त्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया चालू केली. ही अमानवीय चुकीची कृती असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले.