कोट्यावधी रुपये खर्च करून समुद्रात स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका !!!

0
232

भिमाशंकर, दि. १ (पीसीबी) – आपल्याकडे नको इतके पुतळे, समुद्रात स्मारक ! असे म्हणताना कोट्यावधी रुपये खर्च करून समुद्रात स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका असे बोल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी सुनावले. शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी कोरडे ओढले. भिमाशंकर ते शिवनेरी धारातिर्थ गडकोट मोहीमेच्या सांगतेवेळी जुन्नर येथे ते बोलत होते. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान या पदयात्रा मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.हजारो धारकरी या मोहीमेत सहभागी झाले होते.

शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर मोहीमेची सांगता झाली. फेटे, टोप्या परिधान केलेले, राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक राज्यातून हे धारकरी मोहीमेत सहभागी झाले होते. हिंदू म्हणून जगायचं असेल तर शिवाजी-संभाजी हे मृत्यूंजय मंत्र जपावे लागतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी भिडे गुरुजी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,सरकारे सारखी उलथीपालथी होत आहेत,हा त्यांचा धंदा आहे, ते दोन्हीही आपलेच! हिंदुत्वाचे ठेकेदार ! जुने आणि नवे सगळे जे आहे ते देखावे असे म्हणून त्यांनी सरकार बदलण्याच्या घटनांवर निशाणा साधला.

शिवाजी महाराजांनी २८९ लढाया तर संभाजी महाराजांनी १३४ लढाया लढल्या,हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिले,त्यांचे स्मरण करण्यासाठी मिरवणूका, उत्सव सोहळे करून चालणार नाही. तर शिवाजी संभाजी हे होकायंत्र समजून. त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहीजेत असे त्यांनी सांगितले.

संभाजी महाराजांचे बलिदान अत्यंत क्लेशदायक होतं,हिंदुत्वासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचाचे स्मरण करण्यासाठी यंदाच्या वर्षापासून धर्मवीर बलिदान मास पाळण्याचे आवाहन त्यांनी धारकऱ्यांना केले.या काळात गादीवर झोपणे नाही, चप्पल घालणे नाही, शुभकार्याला जाणे नाही. याचे पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले. विना वल्गना राष्ट्र जागे करा, हा मंत्र शिवाजी महाराजांनी दिला आहे. राष्ट्रकार्यात पुढे येण्यासाठी जाहिरात नको, की बोंबाबोंब नको, हे अंगीकारून राष्ट्र जागे करण्याचे आव्हान धारकऱ्यांनी पेलावे, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. धारातीर्थ गडकोट मोहीमेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या घालून या परिक्रमेचे स्वागत करण्यात येत होते.ठिकठिकाणी महिलांनी थांबून भिडे गुरूजींच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.