धनुष्यबाण परत आणण्याचा निर्धार – नाना पटोले

0
548

– सर्वेक्षणात नाना काटे हेच विजयी होणार असल्याची ग्वाही

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी नाना पटोलेंनी शिंदे गट, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

“चिंचवड मतदारसंघात सर्व्हे केला असून यात नाना काटे हे विजयी होणार हे स्पष्ट झाले आहे.पण नाना काटे हे कमी मताने नव्हे तर बहुमताने निवडून आलेलं मला पहाचंय.” असे नाना पटोले म्हणाले. यावेळी नाना पटोले यांनी धनुष्यबाण परत आणण्याचा निर्धार केला.

चिंचवडमधून नाना काटे आणि कसबापेठ मतदार संघातून रविंद्र धंगेकर यांच्या विजयासाठी नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना मूठ बांधण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले “मुठ बांधली की त्याला धनुष्यबाण येतो, घडीही येते आणि पंजाही येतो.हे तीनही येतात. आपला धनुष्यबाण आपल्याला परत आणायचाय. तो कसा आणायचा तो प्लॅन आम्ही करू”

पटोले म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारला ज्या पद्धतीने बेईमानीने पाडलं, धोक्यानं पाडलं, खोक्यानं पाडलं, त्या महाशक्तीच्या जोरावर ते जोर दाखवता आहेत, त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलीय.” असं देखील नाना पटोले म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले,”हे गद्दार सरकार लवकरच कोसळणार आहे. आम्ही खोक्याला हात लावला नाही, पण चाळीस आमदार आणि १३ खासदारांनी तो लावला नसल्याचे अजून सांगितलेले नाही. आघाडीने राज्यपालांचा विषय लावून धरल्याने त्यांना पदावरून जावे लागले,”
वरळी मतदारसंघात झालेल्या शिंदेंच्या सभेवर आदित्य ठाकरेंनी टीका केली.पन्नास खोके असं जो बोलतो त्याच्यावर लगेच धाड पडते असे सांगत केंद्र सरकारही सूडबुद्धीने वागत असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र पुढे जात असल्याचे न पाहवूनच भाजप ही महाशक्ती गद्दारांच्या मागे उभे राहिली,असा आरोप त्यांनी केला.